येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ||धृ ||
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ।। ३ ।।
– संत नामदेव