Kalavati Aai Balopasana
ॐ नम: शिवाय
परमपूज्य आईकृत
बालोपासना
बाळगोपाळांस सूचना
बाळगोपाळांनो रोज सकाळी आंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतील प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल. त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल. मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकाने कपाळाला आठ्या घालून प्रार्थना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन कधी खाईन असे तुम्हाला होत असते ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल.
*बालोपासना*
श्री गणपते विघ्ननाशना । मंगलमूर्ते मूषकवाहना ॥१॥
तिमिर नाशिसी निजज्ञान देउनि । रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी ॥२॥
खड्ग दे मला प्रेमरूपी हे । मारिन षड्रिपु दुष्ट दैत्य हे ॥३॥
बालकापरी जवळी घे मज । ईश जगाचा तू मी तव पदरज ॥४॥
मनोहर तुझी मूर्ति पहावया । लागी दिव्य दृष्टि देई मोरया ॥५॥
पुरवि हेतुला करुनि करुणा । रमवी भजनी कलिमलदहना ॥६॥
आनंदलहरी :
ज्ञानभास्करा शांतिसागरा, भक्तमनोहरा मुकुंदा |
परम उदारा भवभयहरा, रखमाईवरा सुखकंदा ||
पाप ताप दुरितां हराया, तूचि समर्थ यदुराया |
म्हणोनि तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया ||
कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो,
श्यामसुंदरा सर्वकाळ मज, तुझे सगुण रूप दिसो |
तू माउली मी लेकरू देवा, तू स्वामी मी चाकरू |
मी पान तू तरुवरू देवा, तू धेनू मी वासरू |
तू पावन मी पतित देवा, तू दाता मी याचक |
तू फूल मी सुवास देवा, तू मालक मी सेवक |
तू गुळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण |
तू डोंगर मी पाषाण देवा, तू चंदन मी सहाण |
तू चंद्रमा मी चकोर देवा, मी कला तू पौर्णिमा |
तुझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अगाध तुझा महिमा |
तू जल मी बर्फ देवा, तू सागर मी लहरी |
तुजविण क्षण मज युगसम वाटे, हेचि मागणे श्रीहरी |
वत्सास गाय, बाळास माय, तेवी मजला तू आई |
काया वाचा मने सदोदित, तव चरणी सेवा मज दे |
ध्यास नसो दे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो |
दृढतर भावे तव गुण गाता, कोठे माझे मन न रमो |
अनंत रुपा एकोभावे, करितो अनंत नमस्कार |
दासपणाचे सुखसोहळे, भोगू दे प्रभू निरंतर |
नको मज वारी राहू उदास धावत येई यदुराया |
तव दर्शनेविण दूजी न आस धावत येई यदुराया ||
नारायणाष्टक :-
नारायणा हे नारायणा । नारायणा हे नारायणा । नारायणा हे नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
जगादिस्तंभा नारायणा । लक्ष्मीवल्लभा नारायणा । कमलनाभा नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
देवकीनंदना नारायणा । गोपीजीवना नारायणा । कालियामर्दना नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
सुहास्यवदना नारायणा । राजीवलोचना नारायणा । मदनमोहना नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
जगज्जनका नारायणा । जगत्पालका नारायणा । जगन्निवासका नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
पतितपावना नारायणा । पीतवसना नारायणा । शेषशयना नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
त्रिगुणातीता नारायणा । षड्गुणवंता नारायणा । वसुदेवसुता नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
सुरनरवंदना नारायणा । असुरकंदना नारायणा । nityaनिरंजना नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
यदुकुलभूषणा नारायणा । भवसिंधुतारणा नारायणा । कलिमलहरणा नारायणा । नारायणा हे नारायणा ॥
चोवीस नामावळी :-
केशवा, दे मजला विसावा। आलो शरण तुला।
नारायणा, करी मजवरी करूणा। आलो शरण तुला।
माधवा, चैन पडेना जीवा। आलो शरण तुला।
गोविंदा, दे तव नाम छंदा। आलो शरण तुला।
श्रीविष्णु, मी वत्स तू धेनु। आलो शरण तुला।
मधुसूदना, वारि चित्तवेदना। आलो शरण तुला।
त्रिविक्रमा, अगाध तुझा महिमा। आलो शरण तुला।
वामना, पुरवी मनकामना। आलो शरण तुला।
श्रीधरा, तुजविण नको पसारा। आलो शरण तुला।
हृषिकेशा, तोडी वेगी भवपाशा। आलो शरण तुला।
पद्मनाभा, jagataचा तू गाभा। आलो शरण तुला।
दामोदरा, चरणी देई थारा। आलो शरण तुला।
संकर्षणा, तू त्रैलोक्याचा राणा। आलो शरण तुला।
वासुदेवा, सतत देई मज सेवा। आलो शरण तुला।
प्रद्युम्ना, न पाहे तुजविण आना। आलो शरण तुला।
अनिरुद्धा, दे प्रेम भक्ति श्रद्धा। आलो शरण तुला।
पुरुषोत्तमा, भजनी दे मज प्रेमा। आलो शरण तुला।
अधोक्षजा, सत्य सखा तू माझा। आलो शरण तुला।
नरसिंहा, कृपा करिसि तू केव्हां। आलो शरण तुला।
अच्युता, तुजविण नाही त्राता। आलो शरण तुला।
जनार्दना, घे पदरी या दिना। आलो शरण तुला।
उपेन्द्रा, घालवि आळस-निद्रा। आलो शरण तुला।
श्रीहरी, जन्ममरणाते वारी। आलो शरण तुला।
निरंजना, रुक्मिणीच्या जीवना। आलो शरण तुला।
गुरुपादुकाष्टक :-
दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पायी | भवभ्रमातुनी काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||१||
अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनी तुझा दास होऊ इच्छित आहे | तुजविण हे दुःख सांगू कोणासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | २ |
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधू तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ३ |
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मानसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ४ |
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे । तयासीच तू भेट देसी स्वभावे । म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी । नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ॥५॥
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी || ६ ||
सुवर्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही | तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ७ |
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ८ |
नमन करितो अनंता। सुमन वाहतो श्रीकांता। ठेवितो चरणावरी माथा। जय जय यदुवीर समर्था ॥ १ ॥
त्रयभुवनाचा तू कंद। अससी सत-चित-आनंद। परि सगुण होउनि रमविसि भक्तां। जय जय यदुवीर समर्था ॥ २ ॥
देवकीने तुज वाहिले। नंदराणीने पाळिले। तोषविली गोकुळिची जनता। जय जय यदुवीर समर्था ॥ ३ ॥
पुतनेचे विष शोषियेले। अघ-बक असुरा मारियले। करांगुळी गोवर्धन धरिता। जय जय यदुवीर समर्था ॥ ४ ॥
कलियावरी नाचसी। मंजुळ मुरली वाजविसी। यमुनातीरी धेनु चारिता। जय जय यदुवीर समर्था ॥ ५ ॥
गोपीसवे रास खेळसी। अक्रुरासह मथुरे जासी। गज आपटिला भूमिवरुता। जय जय यदुवीर समर्था ॥ ६ ॥
कंसाचे केले कंदन। राज्यी स्थापिला उग्रसेन। सुखविलेसी तात-माता। जय जय यदुवीर समर्था ॥ ७ ॥
गुरूगृही काष्टे वाहिली। विप्रा सुवर्णपुरी दिधली। भक्तांची कामना पुरविता। जय जय यदुवीर समर्था ॥ ८ ॥
अर्जुनासी कथिलि गीता। ती झाली सकलां माता। बोधने कलिमल हरिता। जय जय यदुवीर समर्था ॥ ९ ॥
पूजा :-
गिरिधर मी पूजणार आजी। यदुवीर मी पूजणार। रत्नजडित सिंहासनी बसवुनी। झारीत घेउनि गुलाबपाणी। प्रभुरायाचे मुख न्याहाळोनि। स्वकरे पाय धुणार आजी। गिरिधर मी पूजणार आजी। चंदन उटी लावुनि अंगाला। नेसवुनी पीतांबर पिवळा। अंगावरी भरजरी लाल शेला। पांघराया देणार। जाई जुई मोगरा मालती। चाफा बकुळी सुगंधि शेवंती। दवणा मरवा तुळस वैजयंती। गुंफुनि हार करणार। कपाळी लावुनि कस्तुरिटिळा। सुमनहार घालुनि गळां। हास्यवदन घनश्याम सांवळा। डोळेभर पहाणार। धूप घालुनि दीप लाविन। दूधफळाते प्रेमे अर्पिन। मंगलारती ओवाळून। प्रभूचे गुण गाणार। परमपावना रुक्मिणीजीवना, निशिदिनी करी रत तव गुणगाना। ऐशा भावे करुनि प्रार्थना, पदी मस्तक ठेवणार आजी। तव भक्तिलागी तनु ही झिजू दे। तव चरणकमली मन हे निजू दे। तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया। नमस्कार माझा तुला यदुराया।
कृष्णाची आरती
जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकिंचा ताता| आरती ओवालिता|हरली घोर भाव चिंता ।धन्य ते गोकुळ हो. जेथे करी कृष्ण लीला| धन्य ती देवकी माता , कृष्ण नवमास वाहिला ।
धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला| धन्य ती यमुनाई , कृष्णपदी ठेवी माथा |
धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु खेळविला| धन्य ते बालगोपाल , कृष्ण देई दहिकाला|
धन्य ते गोपगोपी , भोगिती सुखसोहळा | धन्य त्या राधारुक्मिणी, कृष्णप्रेमासरिता ।
कलावती आई आरती
ओवाळू आरती माता कलावती ।पाहता तुझी मूर्ती मनकामनापूर्ती ॥ धृ. ॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले ।
संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले ।
झाली हृत्तापाची पूर्ण शांती ॥ १ ॥
गौरवर्ण तनुवरी शोभे शुभ्र अंबर ।
दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकळ संशय जाती दूर ।
विशालाक्ष मज दे गुणवंती ॥ २ ॥
उद्यापन
हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा! माझ्या मनाची चंचलता दूर कर. हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा! तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे. हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा! माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे. हे ज्ञानेशा, ज्ञानमूर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योती! तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती दृढ कर. हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहरणा, समदृष्टी आणि अढळ शांती मला दे. हे कमलनयना, कमलकांता, कमलनाथा, कमलाधीशा, माझ्या नेत्रांना सर्व चराचरावर तुझेच दर्शन घडू दे. माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत. हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिय! माझ्या हातांनी तुझी पूजा घडू दे, तुझ्या भवती माझ्या पायांना प्रदक्षिणा घालू देत. हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेव! माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे, तुझ्या चरणकमली मला अखंड थार दे.
|| श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||

Thank you so much
HARI OM
OM NAMHA SHIVAY
Pls add mp3 version
Parampujya gurudevta kalavati mata ki jay.