Tuesday, March 19, 2024
HomeKathaMargashirsha MahaLaxmi Guruvar Vrat Katha - Marathi

Margashirsha MahaLaxmi Guruvar Vrat Katha – Marathi

Margashirsha MahaLaxmi Guruvar Vrat Katha

श्रीमहालक्ष्मीची कहाणी

श्री गणेशाय नम: । श्री महालक्ष्मी देव्यै नम: । ॐ श्रीं क्लृं ओम धनद धनं देहिमाम्‌ ।
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्मादिपायच । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: ॥

मन लावून ऎकावी. ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणीद्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहोनी, श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो द्याळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. दास-दासींवर रागावली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी. ओळखते की नाही हे बघावं. राणी राजव्ड्यात सुखाने रहात होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शामबाला.

एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी ? दासी म्ह्णाली, “राणीसाहेब महालात आहेत ! सख्यांशी गप्पा मारताहेत ! त्यांना सागितलं तर माझ्यावर रागावतील. तुला गं त्या कश्या भेटणार ! काय तुझा हा अवतार ! तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उणं-दुणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना !” म्हातारी रागावली, मनोमन संतापली, “ तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली ! आज झालीय राणी. पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना ! मीच तिला व्रत सांगितलं देवीचं ! तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा ! पैशाची धुंदी आलीय ! गोरगरिबांची पर्वा नाही. थोर्‍या मोठ्यांच्या मुली. त्या झाल्या मैत्रिणी ! म्हातारी गरीब अन्‌ भिकारीण ! तिला कोण वचारतयं ! पण, याचं फळं तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी.” दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली,”ते व्रत मला सांगाल ! मी ते नेमानं करीन ! उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही.”त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली, तोच माडीवरुन राणीची कन्या शामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली,”आजी, रागावू नका. चुकली माझी आई ! तिच्या वतीनं मी ख्षामा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या ! म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्शाणभर त्या मुलीकडे पाहिलं, आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून
आली. दाराशी येते, तर म्हातारी दिसली !

राणी ओरडली,” ए थेरडे ! कशाला गं आलीस? जा इथून ! ऊठ म्हणतेय ना ! जातेस की नाही ? दुसरी घरं नाही दिसली तुला ?”

म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली ! दासीपण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरूवारी शामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.

सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर. त्याच्याशी शामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शामबालेला राजवैभव मिळालं. हा होता, लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखा-समाधानानं संसार सालू होता. भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरुन राजा-राणी कष्टाने दिवस काढत होते.

‘भद्रश्रवाला कन्येला भेटावसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासर्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले.

सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवर्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दु:ख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एकेक दिवस दु:खाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे, डोळे भरुन पहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरतचंद्रिका घरुन निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीय. नदीकिनारी बसलीय. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा.”

शामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शामबालानं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फूटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली: सोन्या-मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं.

दुपारची वेळ झाली. शामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, “शामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन !” शामा म्हणाली,”ठिक आहे. “मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शामबाला सोबत गेली.

चार दिवसांनी शामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता, त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, “माहेराहून काय आणलसं ?” शामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं ? मिठाचे खडे ! “अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस ? इथं मिळत नाही मीठ ?” “मीठ मिळतं ना ? पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ ! समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज…” शामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारांत गुंगला.

शामबाला म्हणाली,“हे मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे.” मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले.

भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं.

सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. “आज्ञा करावी महाराज” ते म्ह्णाले. “भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एकेक खडा ठेवा. शपथ घेवून प्रत्येकाला झुंजायला सांगा.” राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेवून बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपुर्व विजय मिळविला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं.

मालाधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरुन मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायाला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार ! शामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप-दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं.

मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे सात पुत्र दुर देशाहून अचानक परत आले. त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला.

या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण . सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित रहावे अशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करावी.

Read full Guruvar Vrat Puja vidhi

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. tumhi khupach chan soy keli katha online wachnyachi,,, aata kamala janarya mahila sudha vrat katha tyancha free time madhe wachun tyanch vrat purn karu shaktil

    thanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular