Saturday, April 20, 2024
HomeKathaHoli Katha in Marathi - होळी महात्म कथा

Holi Katha in Marathi – होळी महात्म कथा

Holi Katha in Marathi – होळी महात्म कथा

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी (Hutashani) पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.

होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.

“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
“होळीला गवऱ्या पाच पाच….. डोक्यावर नाच नाच”…

लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

ह्या होळी बद्दल अनेक लोककथा प्रचलीत आहेत. ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की :

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू ( Hiranyakashyap )नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका (Holika) हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे (Holi) आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी ( Holi ) उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular